इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मितीत भारत अव्वल   

वृत्तवेध 

जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारत झपाट्याने उदयास येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील मूल्यवर्धन पूर्वी केवळ ३० टक्के होते; ते आता सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षापर्यंत ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, नवीन घटक धोरणांतर्गत सरकार मूल्यवर्धन १५-१६ टक्क्यांवरून ४०-५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भारतातून मोबाईल फोनची निर्यात ७७ पट वाढली आहे, जे मेक इन इंडिया उपक्रमाचे मोठे यश दर्शवते.
 
पूर्ण-निर्मित एअर कंडिशनर (सीबीयू) आयात २०१९ मध्ये ३५ टक्के होती. २०२५ मध्ये ती फक्त पाच टक्क्यांवर आली. आता कॉम्प्रेसर, कॉपर ट्युब आणि अ‍ॅल्युमिनियम कॉइलसारखे प्रमुख घटकदेखील भारतात स्थानिक पातळीवर तयार केले जात आहेत. २०२४ मध्ये सुमारे ८५ लाख ‘रॅक’ कॉम्प्रेसर आयात करण्यात आले होते; परंतु पुढील दोन-तीन वर्षांमध्ये ते पूर्णपणे भारतात तयार केले जातील. ‘प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली’ची (पीसीबीए) मागणी व्यवसाय आणि ग्राहक या दोन्ही क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत आहे. यात उच्च आयात शुल्काचाही वाटा आहे. ‘पीसीबीए’ची आयात २०१८ मध्ये ३० हजार कोटी रुपये होती. ती आता जवळपास शून्यावर आली आहे. २०१६ पूर्वी भारत उत्पादनापेक्षा जास्त आयात करायचा; आता मात्र परिस्थिती बदलली आहे. २०२४ मध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाने २४ टक्क्यांपेक्षा अधिक आयात केली आहे. २०१६ ते २०२५ दरम्यान वार्षिक वाढीचा दर २६ टक्क्यांहून अधिक आहे.
 
कुशल मनुष्यबळ, उत्तम पायाभूत सुविधा आणि कॉर्पोरेट कर दर १५ टक्के यांसारख्या सरकारी योजनांमुळे भारत जागतिक कंपन्यांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. आज, भारतात विकले जाणारे ९९ टक्के मोबाईल फोन स्थानिक पातळीवर बनवले जातात. ते देशाच्या वाढत्या उत्पादनक्षमतेचा पुरावा आहेत.

Related Articles